आम्ही महार असतो तर....आचार्य अत्रे

*"आम्ही महार असतो तर" !* आचार्य प्र. के. अत्रे

हा प्रश्न गेले कित्येक दिवस आम्ही आमच्या मनाला विचारित आहोत. गेल्या महिन्यात नागपुर येथे आंबेडकरांनी व त्यांचे दोन लाख महार यानी बौद्ध धर्माचा स्विकार केला. पुढल्या महिन्यात मुंबई येथे दोन ते चार लाख महार बांधवाना बुद्धधर्माची दिक्षा देणार आहेत. भगवान बुद्धाचा धर्म स्वीकारण्याची प्रचंड लाट या देशातील अस्पृश्य समाजामधे उलटलेली आहे. बुद्धधर्मीय झालेल्या महारांच्या अभिनदनांच्या दोन – तीन सभा मधे आम्ही हजर होतो. तेथील चैतन्य आणी हर्षाचे वातवरण आम्ही डोळ्यानी पाहिलेय. त्याच वेळी आमच्या मनात प्रश्न उद्भवला की, आम्ही स्वत: महार असतो तर काय केले असते ?
भारतातील लक्षावधी लोक बुद्धधर्माची दिक्षा स्वीकार करत आहेत ही काय सामान्य घटना आहे ?
शतकानुशतकात न घडलेली ही महान ऎतिहासीक घटना आहे, पण एवढी क्रांतीकारक घटना होत असताना त्याची देशात प्रतिक्रिया काय घडत आहे ?
लक्षावधी अस्पृश्य समाज बुद्धधर्माची दिक्षा स्वीकार करत आहेत हे पाहुन हिन्दु समाजाला काय वाटत आहे ? काही नाही. अक्षरशः काही नाही. कोणालाही त्याबद्दल काही वाटत नाही, आनंद वाटत नाही वा दुख ही वाटत नाही. सावरकरांनी ‘ केसरी ’ त ह्यावर टिका केली असेल तेव्हढीच.

लक्षावधी लोक अस्पृश्य बौद्ध झाले ह्याचा हिन्दु समाजाला केवढा धक्का बसायला पाहिजे होता. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत निषेधाच्या वा शोकाच्या म्हणा, प्रचंड सभा भरवल्या हव्या होत्या, पण असे काहीच घडले नाही. ह्याचा अर्थ हाच नव्हे काय की, हिन्दु धर्मातुन कोणी कितीही संख्येने बाहेर पडले तरी, बाकीच्या हिन्दु समाजाला त्याचे काहीच वाटत नाही, जणु काही तो असेच म्हणत असतो की, ‘जा .... हवे तितके जा, आमच्या धर्मातुन जा, आमच्या धर्माचे आणी समाजाचे तुमच्या जाण्याने काडी इतका ही नुकसान होणार नाही, गेली पाच हजार वर्षे परधर्मात जाण्यार्या सह्स्त्रावधी हिन्दुंच्या बद्दल बाकीच्या हिन्दु समाजाची हीच बेफिकीरी व बेपर्वाइची वृत्ती आहे. हिन्दु धर्मात बाहेरुन कोणी येण्याचा मुळी प्रश्नच उत्पन्न होत नाही. जो उठतो तो या धर्मातुन बाहेर पडतो. ह्या गोष्टीचा विचार करणे जरुरीच आहे, त्यावर उपाय शोधुन काढणे आवश्यक आहे असे हिन्दु लोकांना वा समाजाला मुळीच वाटत नाही.

आंबेडकरानी व अनुयायानी दिक्षा घेतली ह्याचे आम्हाला आश्चर्य आणी वाईट वाटत नाही, उलट आनन्द वाटतो. कोणी म्हणेल की तुम्ही हिन्दु धर्माचे शत्रु आहात.

आंबेडकरानी व त्यांच्या अनुयायानी ‘धर्म्मांतर‘ केले हा शब्द प्रयोग आम्हाला पसंत नाही, त्यानी धर्म स्विकार केला असेच आम्ही म्हणु. अस्पृश्य समाज हा हिन्दु आहे ही गोष्टच मुळी आम्हाला मान्य नाही. आम्ही त्याना धर्मा पासुन नेहमीच दुर ठेवले आहे , म्हणुन त्यांनी बुद्धधर्म स्विकारला, ह्याबद्दल हिन्दुनां शोक करण्याचा काडीमात्र अधिकार नाही.

बुद्धधर्म हा हिन्दु धर्माचाच एक भाग आहे अशी मखलाशी आमच्यातले काही दिड शहाणे करतात, तो त्यांचा मत्सर आणी घमेंडखोरपणा आहे. कोणी म्हणतं बौद्ध होवून त्यांची अस्पृश्यता जाणार नाही. कोणी म्हणतं बौद्ध होवुन त्यांची आर्थिक सुधारणा होणार नाही. असे म्हणणार्याना बौद्धधर्म स्विकारण्यार्यांची भावना मुळी कळलीच नाही. बौद्ध झाल्याने हिन्दु लोक आपल्याला अस्पृश्य समजणार नाहीत आणि आपली आर्थिक सुधारणा होणार नाही ही गोष्ट काय आंबेडकरांना समजत नव्हती ?

आंबेडकरांना त्याची बिलकुल पर्वा नाही. उलट झगडुन
मिळविलेल्या आपल्या राजकिय हक्कावर पाणी सोडायला सुद्धा ते तयार झाले आहेत. ह्याचे कारण धर्माला आणि संस्कृतीला हजारो वर्षे सतावलेल्या कोट्यावधी अस्पृश्याना न्यायावर आणि समतेवर आधारलेल्या एका महान धर्माची, तत्वज्ञानाची आणि संस्कृतीची दिक्षा देण्याची आंबेडकरांना तळमळ लागली आहे.

बुद्धधर्माच्या दिक्षातील आचारांचे जर समाज काटेकोर पालन करील तर एक पिढीच्या आत ह्या सर्व समाजाची बौद्धीक आणी नैतीक उंची सर्वसमान्य हिन्दु समाजपेक्षाही वाढल्याशिवाय राहणार नाही. बुद्धधर्माचा स्विकार हा अस्पृश्य समाजाचा महान प्रयत्न आहे. त्याना नावे ठेवण्याचा हिन्दुना अधिकार नाही.

आम्ही महार असतो तर हेच केले असते !

*लेखक - आचार्य प्र. के. अत्रे*
*(मराठा - २२/११/१९५६)*

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट