Human Reproduction System
माझ्या मुलाचा अभ्यास मीच घेते. ट्युशनला तसा माझा विरोधच आहे.आपण एवढा अभ्यास करून शाळेची निवड करीत असतो आणि शेवटी आपली सगळी मदार हि ट्युशन क्लासेसवरच अवलंबून राहते .कितीही शाळा बदला. प्रवेश घेईपर्यंत सगळं काही आलबेल असणारे नंतर काहीच ठीक नाही असे काहीसे चित्र निर्माण होते. घरो घरी मातीच्या चुली याप्रमाणे सगळ्या शाळा सारख्याच असे काही समीकरण तयार होते आणि आहे ते ठीकच आहे यातच सौख्य सामावून घेण्याची वेळ येते.
मी आपली नेहमीप्रमाणे मुलाला शाळेत आज काय काय झाले वगैरे विचारपूस करून त्याच्या अभ्यासाला सुरुवात केली. आज आपण सायन्सचा नवीन लेसन सुरु करुत म्हणून पुस्तक हातात घेतले. तोच माझा आठवीत शिकत असलेला मुलगा नको म्हणाला ,माझे मी करून घेतो . नेहमी मी शिकविल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही तो आज नेहमीप्रमाणे शिकण्यास उत्सुक नव्हता. याने मला जरा मनात शंका आली. मी त्याला विचारल्यानंतर बोलू लागला , कसलं लेसन आहे ,काहीही आहे, काय गरज होती का याची वगैरे वगैरे .
तर हा लेसन होता Human reproductive system . ज्यात स्त्री आणि पुरुषांची प्रजनन प्रणाली ,शरीर रचना याबाबत सविस्तर माहिती होती.
किशोरवयीन मुलांना हा विषय अवघडल्यासारखं वाटणे साहजिकच आहे. परंतु त्याचा हा अवघडलेपणा आधी बाजूला काढणे गरजेचे होते. त्यामुळे सुरुवात करीत असताना त्याला यात काही गैर असे नाही हे समजावून सांगितले. तुला तुझ्या शरीराची लाज वाटते का? हा प्रश्न त्याला केल्यानंतर तो नाही म्हणाला. मग त्याचा अभ्यास करीत असताना लाज बाळगण्याचे कारणच काय ?हे त्याला विचारल्यानंतर त्याला लक्षात आले. आज तुला जरी हा विषय नकोसा वाटत असला तरी उद्या तू याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करशील आणि हि माहिती चुकीच्या पद्धतीने तुझ्यासमोर आली तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील हेही सांगितले. आज योग्य पद्धतीने जर तू याचा अभ्यास केलास तर चुकीची माहिती यापासून दूर राहशील आणि आपल्या शरीरात होत असणाऱ्या बदलाबद्दल जे प्रश्न तुझ्या मनात निर्माण होत असतात त्याचीच तर उत्तरे यातून मिळणार आहेत .हे समजल्यानंतर त्याला ते पटले.
यात किशोरवयीन मुलगा आणि मुलगी यांच्या शरीरात परिपक्व होण्यापर्यंतचा होणारा बदल सविस्तर शिकवण्यात आलेला आहे. त्याला संपूर्ण लेसन व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर त्याला यात काही गैर असल्याचे विचारल्यानंतर त्याचे उत्तर नाही असे आले.
स्त्रियांच्या मासिक पाळीबद्दल माहिती दिल्यानंतर त्याला स्त्रियांच्या प्रत्येक महिन्याला होत असलेल्या त्रासाची जाणीव झाली. बाळाला जन्म देणे हे सोप्पे काम नाही हे समजले आणि स्त्रीजन्म किती कठीण आहे याची कल्पना आली.
शिवाय वयात येणाऱ्या मुलींना योग्य ती माहिती देणे ,स्वच्छतेची काळजी घेणे त्या दिवसात याबाबत आयांनी मैत्रीण बनून तिच्याशी संवाद साधला पाहिजे. काहीतरी फार मोठे आभाळ कोसळल्यागत न वागता मोकळेपणाने तिच्या मनात या वयात तयार होणाऱ्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजे. का होते,कसे होते याची उत्तरे दिली पाहिजे. प्रत्येक प्रश्नाला असे होत असते अशी बाष्कळ उत्तरे देणे टाळले पाहिजे. जे उत्तर मला पडलेल्या प्रश्नाला मिळत होते . या विषयावर बोलणे म्हणजे अघोषित बंदीच. बोलले तरी दबक्या आवाजातच !!!! याला धार्मिकतेचा मुलामा लावून स्त्रियांवर बंधने लादण्यात आली. ज्याचा स्वीकार तीनेही संस्कृतीच्या नावाखाली केला. ज्यात तिलाही काहीच गैर वाटले नाही आणि हे नियम पाळण्यातच धन्यता मानली.. शालेय अभ्यासक्रमातून हा विषय हाताळल्याने बरीच प्रश्नांची उत्तरे मुलांना योग्य पद्धतीने मिळून जातात.
मी सध्या मासिक कप (मेन्स्ट्रुअल कप ) याबाबत जनजागरणाचे काम करीत आहे. सॅनिटरी प्याडऐवजी हा वापरता येतो. हा कप रियुजेबल असल्याने एकदा खरेदी केल्यानंतर किमान दहा वर्षे वापरता येणार आहे. सॅनिटरी प्याडमुळे भारतात सुमारे पाच हजार टन कचरा तयार होत असतो. शिवाय तो नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षे सुमारे ५००-८०० वर्षे लागत असतात. यावरूनच प्रदूषणाची कल्पना करू शकता. सध्या सॅनिटरी प्याडचे दुष्परिणाम आणि वाढते प्रदूषण याला पर्याय म्हणून हा मासिक कप वापरला जाऊ शकतो. परंतु याचा प्रसार होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे असेच वाटत आहे. यावरील मिळणार्या प्रतीसादावरुनच हे लक्षात येते. आलतु फालतु पोष्टवर चर्चा करतील. परंतु इथे ब्र काढणार नाहीत एवढं थंड पडतील.
पर्यावरणाबाबत जागृत महिला समोर येत आहे ,याबाबत विचारपूस करीत आहेत आणि काहीजण वापरण्यासाठीही मानसिकता दाखवत आहेत हेही एक आशेचाच किरण आहे म्हणायचे.
माझा असा अनुभव आहे कि अगदी शिकलेल्या स्त्रियाही यावर बोलण्यास तयार नसतात. कमाल वाटते !!!! हि एक नैसर्गिक क्रिया आहे .याबाबत एवढं गोपनीयता बाळगण्याचे कारणच काय??? काहीतरी गोपनीय विषय चर्चिला जातो कि काय अशा भावात हळुवार आवाजात फुसफुसत बोलले जाते !!! आजही बाजूला बसने, शिवायचं नाही असले प्रकार प्रथा म्हणून पाळल्या जाताना आश्चर्य वाटते !!!! ज्यामुळे एका जीवाचा जन्म होतो, जी पाळी स्त्रियांना स्त्रीत्व देते ती पाळी अपवित्र कशी असू शकते ????हा नेहमीच मला पडणारा प्रश्न आहे.
खरे पाहता आजची काळाची हि गरजच आहे. प्रत्येक पालकाला आपले पाल्य हे अजून लहानच आहे असे वाटत असते आणि याची आताच काय गरज आहे असा प्रश्न मनात निर्माण होत असतो.परंतु जीवनाच्या कालगणनेप्रमाणे आपले मुलं वाढत असते ,मोठे होत असते आणि योग्य वयातच याला लैंगिक शिक्षण दिले गेले तर पुढील होणारा अनर्थ टळणार आहे.
इथे आता काहीजण मग आम्हाला असे काही शिक्षण दिले गेले नाही तर मग आम्ही बिघडलो का ??वगैरे वगैरे प्रश्न निर्माण करतील. अहो ! आपण बिघडलो नाही चांगलेच ,परंतु आपली मुले बिघडणार नाहीत याची काय ग्यारंटी ??? शिवाय सध्याचे बदलले वातावरण , बलात्काराच्या अल्पवयीन मुलांकडून घडत असलेल्या घटना हे काय सांगत आहे ??? पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत मुले वाढत होती, आज्जी आजोबा ,घरातील वयस्क व्यक्तींकडून संस्काराचे धडे मिळत होते, योग्य वयात लग्ने होत होती ....
आज सगळेच चित्र बदलले आहे. त्रिकोणी चौकोनी कुटुंब , पालक दोघेही नौकरीला जाणारे असतील तर मुलांसाठी त्यांच्याजवळ वेळ नाही, आजी आजोबा जवळ असले तर आनंद नाहीतर मुले सुखवस्तूने गुंडाळली जातात, मुलांची सुरक्षा म्हणून आजकाल आईबाबा मुलांच्या हातात भारी मोबाईल ठेवून आपली काळजी व्यक्त करतात .यातूनच मुलांवर लक्ष ठेवायला कोणी नसल्याने हातातच सगळे जग आलेले असते .याचा अर्थ असा होत नाही कि मुलांवर सारखे दुर्बीण लावूनच लक्ष ठेवले पाहिजे अथवा आपली मुले तशी नाहीत,आपले चांगलेच संस्कार त्यांच्यावर आहेत या भ्रमाचा भोपळ्यातही राहणे असे होत नाही. यामधील सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. स्वातंत्र आणि स्वैराचार यातील अंतर मुलांना समजले पाहिजे.
आपल्या मुलांसाठी वेळ काढला पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला तर आपल्या मुलांचे चांगले मित्र बनू शकता. अन्यथा दुराव्याची दरी वाढतच जाते आणि मुले कुटुंबासाठी रुक्ष स्वभावाची होऊन जातात.
विचार तर कराल?
टिप्पण्या