साऊथ च्या रानगव्याची गोष्ट
आत्ताच एक सौथचा सिनेमा बघत होतो. किमान दहा पोरांचा बाप शोभेल असा रानगवा कॉलेजात विद्यार्थी बनून आला होता. त्याच्या आयटमला गुंडे छेडत होते. आयटम त्याला उचकावत होती, मार त्यांना म्हणून. शेवटी त्या रानगव्याच्या बाहुत स्फुरण फुरफुरले. बहुदा तो डिझेल इंजिन असावा. टर्बोने दणका दिल्या शिवाय स्पीड पकडायचा नाही असा नियम असेल त्याचा. त्या आयटमने त्याच्या पार्श्वभागावर एक सणसणीत लाथ घातली आणि रानगवा चेकाळला.
त्याने पहिल्या गुंडाला एक लाथ मारली, तो सरळ सिलिंग फॅनला जाऊन लटकला. दुसयाच्या पोटात एक गुद्दा मारला आणि तो थेट बिल्डिंगच्या बाहेर जाऊन चिखलात लोळायला लागला. तिसर्याने दात ओठ खात रानगव्याला मागून मिठी मारली. रानगव्याला आता गुदगुल्या व्हायला लागल्या होत्या. तो नाचायला लागला. मग त्या आयटमने नाचणे अपेक्षित नसून मारणे अपेक्षित आहे असे त्याला सांगितल्यावर त्याने त्याला गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम फेक आहेत असे सिद्ध करत बडीवला.
पुढे मग त्या षीणेेमात एक मोठा व्हिलन आला, त्याने त्या आयटमच्या बेंबीकडे बघत लव्हशिप मागितली. आयटमने मी देणार नाही असे म्हटले. त्या व्हिलनला राग आला. त्याने तिच्यावर गोळी झाडली. रानगवा मध्ये आला. परत फिजिक्सला त्याने कोठ्यावर बसवले, फिजिक्सकडून नंगा नाच करून घेत त्याने ती गोळी दातात पकडली. तोंडात चावून तिच्या पंचवीस गोळ्या केल्या. फिजिक्स आता बुधवाऱ्यात असल्यामुळे चिंताच नव्हती. त्याने त्या पंचवीस गोळ्या थुंकल्या आणि समोर असलेले पंचवीस चोंगे क्षणार्धात मेले.
आता रानगवा आयटमचा चुम्मा घेणार इतक्यात एका गोळीने त्याच्या छातीचा वेध घेतला. हृदयात घुसलेल्या गोळीचा बाऊ न करता त्या रानगव्याने त्या गोळीमारला चेचला. आता अत्याचार सहन करण्याची बारी बायोलॉजीची होती. आयटमने रानगव्याला गाडीत कोंबला. हृदयात गोळी असतांना आणि हॉस्पिटल दहा मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे काय करावे हे दोघांनाही सुचत नव्हते. मग झटक्यात दोघे यूरोपीय आल्प्सला गेले, गाणे बिणे गायले, मोगऱ्याची फुले वगरे कुस्करली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
डॉक्टरांनी हृदय निकामी झालेय असे सांगितले. रानगव्याची म्हातारी मरायला टेकलीच होती. हे ऐकून ती गचकली आणि कोणीतरी तिचे हृदय लेगपीस तोडावा तसा तोडून काढल. रानगव्याचा रान डुक्कर टाईप मित्र ते हृदय घेऊन धावला. दस सेकंड में हृदय नही आया तो रागगवा मरणार होता. रान डुक्कराने ते हृदय डायरेक्ट ऑपरेशन थेटरात फेकले, ते जागेवर बसले, डॉक्टरांनी खपाखप दाभण घेऊन रानगव्याची छाती शिवून टाकली.
दुसऱ्या दिवशी रानगवा आणि त्याच्या आयटमने म्हातारीच्या फोटोला नमस्कार करत सुहाग रात्र साजरी केली.
#हर्षदशामकांतबर्वे
©हर्षद शामकांत बर्वे, औरंगाबाद
Feel free to share
टिप्पण्या