पासपोर्ट कसा मिळवाल

अच्छे दिन आ गए !
पासपोर्ट एक सुखद अनुभव

जानेवारी इ.स. २०१० मध्ये दुबईला जातेवेळी प्रथमच काढलेले आम्हां उभयतांचे पासपोर्टची दहा वर्षांची मुदत संपल्याने जानेवारी २०१८ ला आम्हाला त्यांचे नूतनीकारण करावे लागणार होते. मागील वेळी सन २०१० मध्ये पासपोर्ट मिळवतांना आलेले कटू अनुभव आठवून अंगावर काटाच उभा राहिला. पुन्हा एकदा त्याच दिव्यातून जावे लागणार असे वाटले. पण अखेरीस पासपोर्ट नूतनीकरण करावे तर लागणारच असल्याने त्यासाठी काय करावे लागणार याची चौकशी केल्यावर, त्यासाठी भारत सरकारच्या पासपोर्टच्या वेब साइटवर ऑन लाईन नूतनी करणाचा फॉर्म भरून सादर केल्यावर व रीतसर नोंदणी फी भरल्यावर लगेच त्यांच्याकडून प्रत्यक्ष मुलाखतीची वेळ व तारीख मिळाली.
आम्हाला ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १०.१५ अशी मुलाखतीची वेळ देण्यात आली होती व त्यासाठी आम्हाला सकाळी १०.०० वाजता रिपोर्टिंग करावे असे सुचवण्यात आले होते. सोबत फॉर्म भरतेवेळी स्कॅन करून जोडलेले आधार कार्ड व इलेक्शन कार्ड यांच्या मुळप्रती व एकेक स्वाक्षांकीत केलेल्या सत्यप्रती ,मुलखातीसाठी त्यांच्याकडून आलेल्या अपॉइंटमेंट लेटरची स्कॅन फोटो कॉपी,नोंदणी फी भरलेल्या रिसीटची स्कॅन केलेली फोटो कॉपी व त्यांना सादर केलेल्या फॉर्मच्या कागदपत्रांची फोटो कॉपी तसेच मूळचा पासपोर्ट घेऊन येण्यास सांगितले होते.
त्यानुसार आम्ही दोघे सकाळी ९-४५ वाजता मुढव्यातील एका बहुमजली व्यापारी संकुलात तळ मजल्यावर असलेल्या पासपोर्ट (पारपत्र) कार्यालच्या गेटवर पोहोचलो. आम्ही पोहोचलो तेंव्हा तेथे गेटबाहेर पासपोर्टसाठी आलेल्या नागरिकांच्या दोन भल्यामोठ्या रांगा लागलेल्या होत्या.चौकशी केल्यावर असे कळले की त्यातील एक रांग ९.३० ची व दुसरी ९.४५ ची असून १०.०० ची रांग अद्याप सुरू व्हायची आहे.
थोड्यावेळाने १०.०० रिपोर्टिंगची वेळ असणारांची रांग सुरू झाल्यावर आम्ही त्या रांगेत उभे राहिलो. बरोबर १०.१५ वाजता अपॉइंटमेंट लेटर वरची दिलेली वेळ पडताळून मगच आम्हा रांगेतील हजर असलेल्या सगळ्यांना गेटमधून आत घेण्यात आले.
त्यानंतर मुख्य कार्यालयाच्या आत गेलेल्या पहिल्या गटाचे काम पूर्ण होत आल्यावर आम्हाला मुख्य इमारतीत सोडण्यात आले. तेथे सुवातीला २-३ ठिकाणी टोकन नंबर देण्यासाठीच्या खिडक्या होत्या. तेथे आत आलेल्या नागरिकांनी आपला नंबर पहिला लागावा म्हणून धावपळ/धक्काबुक्की असे प्रकार केले पण तसे करण्याची खरच काही आवश्यकता नव्हती,कारण तुम्हाला देण्यात येणारा टोकन नंबर हा ऑटो जनरेटेड असल्याने त्यात कोणीही वाशिल्याने अगर ओळखीने बदल करूच शकत नाही व पुढील सर्व ठिकाणी बँके प्रमाणे या टोकन नंबरवरच काम होते.
तेथे A-1 ते A-25 अशा २५ खिडक्या होत्या तर B-1 ते B-10 अशा १० खिडक्या व C-१ ते C-5 अशा 5 खिडक्या होत्या.
एकदा का तुम्हाला टोकन नंबर मिळाला की तुम्हाला पुढे दिलेल्या तीन खिडक्यावर जावे लागते. A , B व C. प्रत्येक ठिकाणी एका डिस्प्लेबोर्डवर तुमचा टोकन नंबर व तुम्ही कोणत्या खिडकीवर जायचे याचे मार्गदर्शन करण्यात येते.
पासपोर्टचे हे नवे कार्यालय एकदम प्रशस्त जागेत असून भरपूर उजेड,स्वच्छता,नागरिकांना बसण्याची आसन व्यवस्था वाखाणण्यासारखी आहे.
यापैकी A खिडकीवर तुमच्या कागद पत्रातील माहितीची मूळ दस्तांबरोबर तपासणी केली जाते,तुमचे नांव ,पत्ता,जन्मतारीख इ. तपासले जाते.
तेथून पुढे B खिडकीवर तुमच्या दोन्ही हाताच्या अंगठ्यांचे व उर्वरीत चार बोटांचे ठसे घेण्यात येतात व तुमचा फोटो स्कॅन करून घेतला जातो. ही बायोबेट्रीक तपासणी पूर्ण झाल्यावर शेवटच्या C खिडकीवर एका पासपोर्ट च्या अधिकार्‍या कडून सगळे व्यवस्थित झाल्याची खातरजमा करून घेतली जाते व तुम्हाला बाहेर जाण्यासाठी एका शेवटच्या खिकीवर तुमच्या टोकन नंबरचा कागद दिल्यावरच तुम्हाला गेटपास इश्यू केला जातो,जो बाहेर जाण्याच्या दरजावरील सुरक्षा रक्षकास दिल्यावरच तुम्हाला कार्यालयातून बाहेर पडता येते. आंत गेल्यापासून या सर्व प्रकिया पूर्ण करून तुम्ही अवघ्या अर्धा ते पाऊण तासात बाहेर पडता.
हे सगळे काम संपवून आम्ही बाहेर पडून आमच्या घरी पोहोचण्याच्या आंतच (वाटेतच) माझ्या मोबाईलवर ' तुमचा पासपोर्ट छपाई साठी गेला आहे व तो तयार होताच तुमच्या कडे स्पीड पोस्टने रवाना कारण्यात येईल व तुम्हाला तसे कळवण्यात येईल' असा एस.एम.एस सुद्धा आला.
दुसर्यााच दिवशी म्हणजे ६ फेब्रुवारीला संध्याकाळी दूसरा एस,एम,एस. आला की तुमच्या पासपोर्टची छपाई पूर्ण झाली असून तुमच्या पत्त्यावर तो स्पीड पोस्टाने रवाना करण्या येत आहे. व आज दुयारी १.०० वाजता तो आम्हाला घरपोच मिळाला देखील. (त्याचाच फोटो वर दिला आहे)
कुठेही चकरा माराव्या लागल्या नाही किंवा कोणालाही एक दमडाही द्यावा लागला नाही किंवा हात ओले करावे लागले नाहीत अगर दलालाची भर करावी लागली नाही.
खरचं अद्याप विश्वासशी बसत नाही ,आपण स्वप्नात तर नाही ना असेच वाटत आहे. भारतात हे असे काही घडेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते,पण आता तर हा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर रहावले नाही म्हणून हे सर्वांबरोबर शेअर करावेसे वाटले.
याहून अच्छे दिन ते कोणते असू शकतात ? माझी तर या अनुभवावरून खात्रीच पटली की नक्कीच अच्छे दिन सुरू झाले आहेत यात काही शंकाच नाही.

प्रमोद तांबे 

https://m.facebook.com/groups/255759767822481?view=permalink&id=1616209048444206


पुणे - ८ फेब्रुवारी,२०१८

आभार !!!!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट