पतिव्रता उर्मिला
*उर्मिला*
उर्मिला...लक्ष्मणाची अर्धांगिनी....पती हाच परमेश्वर आणि त्याची व त्याच्या कुटुंबियांची सेवा हाच स्त्रीधर्म असे मनात घोकूनच तिने महालात प्रवेश केला. सीता आणि उर्मिला सख्या बहिणी.....राम आणि लक्ष्मणासोबत त्यान्च्या त्यांच्या नवीन आयुष्याची सुरवात झाली....सीतेसाठी तिचा पतीचं सर्वस्व होता.... पण उर्मिलेसाठी पती बरोबर च पतीला प्रिय असणारी प्रत्येक गोष्ट महत्वाची होती. एक दिवस अचानक तिला कळलं की रामाला १४ वर्षां साठी वनवासाला जावं लागतं आहे आणि त्यांच्या बरोबरच सीता व लक्ष्मणाने पण जायचे ठरवले आहे. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता....तिनेही ठरवलं की आपणही त्यांच्या सोबत जायचं...पण नंतर विचार केल्यावर तिच्या लक्षात आले की सगळेच वनवासाला गेले तर लक्ष्मणाच्या आप्तेष्ठांची, राज्याची(जे त्याला प्राणप्रिय होते) त्याची काळजी कोण घेणार....?तिने वनवासाला न जाण्याचा निश्चय केला. डोळ्या तून दोन मोती निखळले.... तिचा वनवास 'फक्त' १४ वर्षात संपणार होता.....तिने अजून काहीतरी ठरवलं.....डोळ्यातले ते मोती सौभाग्यालांकर म्हुणून जपून ठेवत तिने डोळे कोरडे केले. सगळा नववधू सारखा साज शृंगार करून ती लक्ष्मण यायची वाट बघू लागली.
लक्ष्मण तिथे आल्यावर उर्मिलेच हे रूप बघून अचंभीत झाला...संतापला... आम्ही वनवासाला जात असताना तुला साजशृंगार सुचतो आहे...मला तर वाटलं होतं तू माझ्यासोबत येण्याचा हट्ट करशील....पण तू माझा भ्रमनिरास केलास...उर्मिला त्यावर म्हणाली हा साज शृंगार हेच माझे जीवन आहे.... तो सोडून मी तुमच्या बरोबर कदापी येऊ शकत नाही.... हे ऐकून लक्ष्मण खूप दुःखी झाला.'आता या पुढील जीवन रामाच्या चरणी अर्पण करायचे' हा दृढ निश्चय करूनच तो तिथून निघाला..
उर्मीलाला हेच तर हवं होतं... आनंद आणि दुःख अशा दोन्ही संमिश्र भावना डोळ्या तून वाहून गेल्या....सावकाश तिने सगळे भरजरी वस्त्र उतरवले....एका वस्त्रनिशी ती तिच्या पुढच्या आयुष्याला प्रारंभ करणार होती...आता कुठें तिच्या वनवासाची खरी सुरवात झाली...खरतर जशी पतिव्रता सीता होती तशीच उर्मिलापण होती....पण सीतेला मिळाला तो पती सहवास आणि उर्मीलाला मात्र विरह....त्या १४ वर्षांसाठी तिने पतीच्या मनातल्या तिच्या जागेलाही ओरबाडून बाहेर काढले होते. फक्त त्याचा निश्चय डळमळीत होऊ नये म्हणून... मग खरा वनवास कोणी भोगला सीतेने की उर्मिलेने? उर्मीलाला एक प्रश्न आयुष्य भर छळत राहिला....'का लक्ष्मणाने तिच्यावर विश्वास दाखवला नाही??? का तो असं म्हणाला नाही की माझी उर्मिला अशी नाही?' तिने जे दाखवलं तेच त्याने बघितलं.. का तो तीचं मन वाचू शकला नाही????१४ वर्ष नंतर सीतेला एका अग्निपरीक्षेला सामोरी जावे लागलें म्हुणून लोकांनी आज तिचे देऊळ बांधले....पण या अश्या कित्येक अग्निपरीक्षा रोज झेलणाऱ्या उर्मिलेच मात्र एकही देऊळ नाही....की अजून धरणी मातेने तिला तिच्यात सामावून घेतले नाही...ती उर्मिला अजूनही उपेक्षित...प्रत्येक घराघरात... एक 'सामान्य' स्त्री बनून... प्रत्येक दुःख,अन्याय हसत झेलून उभी आहे त्याच माणसांचं कवच बनून...न थांबता...न थकता...तिने घेतलेले अविरत व्रत ती अजूनही पाळते आहे.... पुढच्या पिढीला तिचा वसा देऊन...कारण अजूनही तिचा वनवास संपवायला ना कुठला राम आलाय ना लक्ष्मण.... प्रत्येक पिढीतली ही 'उर्मिला' मात्र खंबीर होत चालली आहे... आयुष्यातली प्रत्येक लढाई लढायला तिला आता कुठल्याही लक्ष्मणाची गरज उरली नाही...स्वतःचा उद्धार करायला तिला आता 'राम-लक्ष्मणच्या ' देवळात जावं लागतं नाही....
टिप्पण्या