समाजाला आपली गरज आहे

आदिवासी समाजाची बांधणी करण्यासठी सुशिक्षित व उच्चशिक्षित आदिवासी, कर्मचारी, अधिकारी,लोकप्रतिनिधी,साहित्यिक तसेच धनवान आदिवासींनी पुढे यावे!

आदिवासी बंधुंनो,

तुम्ही एका अशा सुवर्णयुगाच्या निर्मात्या मानवाचे वंशज आहात. ज्यांनी या देशात आदर्श नगररचना, कला,साहित्य,संस्कृती व मानवी सभ्यता यांची निर्मिती  केली होती.
मध्यंतरीच्या काळात मानवप्राण्यातीलच काही काही आक्रमक गटांनी ती संस्कृती  उध्वस्त केली. पण संस्कृती कधीही मुळापासून नष्ट होत नसते ती मातीत रुजलेली असते. सुप्तावस्था संपवून ती पुन्हा अंकुरत असते.
थोडक्यात माणसाचे सर्वक्षेत्रव्यापी जगणे म्हणजे संस्कृती. सामाजिकता, सहकार्यता, प्रेम,भूतदया,बंधुभाव, कृतज्ञता, विश्वास आदी मानवी मूल्यांच्या पायावर संस्कृती उभी राहात असते.

आपल्या दैदीप्यमान व मानवी सभ्यतेच्या संस्कृतीला  पुन्हा एकदा या भूमीवरची मुख्यधारा म्हणून नावारुपास आणण्यासाठी चला पहिल्यांदा योग्य समाज बांधणी करूया.

▪ध्येय उच्च ठेवा:-

फक्त पोटासाठी नोकरी मिळाली की बस! आता जीवन सार्थक झाले असा विचार करणे हे जिवंतपणाचे लक्षण नाही. या जगात पोट तर सारेच प्राणी मिळेल ते खाऊन भरतात.आपली वैचारिक शक्ती वापरा. जीवनाचे ध्येय उच्च ठेवा.

▪निरनिराळे साहित्य वाचा वैचारिक प्रगल्भता वाढेल:-

मानवी मेंदू हा मानवाला मिळालेले अनमोल इंद्रिय आहे. तेच तुमच्या या जगातल्या  अस्तित्वाची जाणीव करून देते. हे इंद्रिय अधिक सक्षम करण्यासाठी व तुमची वैचारिक परिपक्वता वाढविण्यासाठी विविध विषयांवरचे वाचन करा.वेगवेगळ्या साहित्यिकांचे साहित्य वाचा.यातून तुमची काही निश्चित मते तयार होत जातील.जी तुमच्यावर कोणी लादलेली नसतील तर तुम्ही ती स्वतः मान्य केलेली असतील.काही मते तुमची स्वतःची असतील.जी तुमचे समाजातील असणे सिद्ध करतील.

केवळ दुसरा मानतो म्हणून काही गोष्टी मानू नका. श्रद्धा म्हणून काही गोष्टींच्या अधीन होऊ नका. त्यामुळे अंधश्रद्धेचा अंधार वाढत जातो.त्या अंधारात सत्य दिसत नाही.

▪मानसिक गुलामी नष्ट करा:-

आदिवासी समाजात सध्या मानसिक गुलामी ही फार गंभीर समस्या होऊ पाहते आहे.मानसिक गुलाम असलेली माणसे इतिहास घडवू शकत नाहीत.त्यासाठी स्वाभिमान जपून आधी मानसिक गुलामी नष्ट करण्याचा प्रयत्न करा.

▪सध्याच्या  वास्तविक परिस्थितीकडे डोळेझाक करू नका:-
सध्या आदिवासी समाजातील फार मोठी संख्या  ही गरिबी, अज्ञान, मूलभूत गरजा, भूकमारी,कुपोषण आदी समस्यांनी त्रस्त आहे.

सध्या आदिवासींच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा,शिक्षण,आरोग्य,रोजगार या गरजा पूर्ण करण्याऐवजी शासन शासन आदिवासी क्षेत्रात डॅम, प्रकल्प ,उद्योगधंदे उभारून त्याचा जास्तीत जास्त फायदा गैरआदिवासींना देत आहे.आदिवासी विस्थापित होत आहेत.उद्योगपतींच्या हितासाठी जमिनी हडप केल्या जात आहेत.आदिवासी परिसरात विनाकारण नक्षलवादाला प्रोत्साहन मिळेल असे वातावरण तयार केले जात आहे.यात मरणारे व मारणारेही फक्त आदिवासीच आहेत. विनाकारण पोलिसांचा दबाव वाढवत आहेत.आदिवासींना आधीच कायदे शिकवले गेले नाहीत.त्याच कायद्याचा वापर करून आदिवासींना फसवणे,धरपकड करणे,अत्याचार करणे, कायद्याचा चुकीचा अर्थ लावून आदिवासी क्षेत्रातील आर्थिक स्रोतांवर मजबूत पकड बनवली जात आहे.
शासनाचे राजकीय ठेकेदार आदिवासींचे शोषण करत आहेत.जल,जंगल,जमीन यांच्याशी जीवन निगडित असणाऱ्या आदिवासींचे पर्यावरण उध्वस्त केले जात आहे.
येणाऱ्या काळात आदिवासींचे सामाजिक, आर्थिक,सांस्कृतिक,भौगोलिक शोषण सुरूच राहिले तर आदिवासी हा आदिवासी समाज म्हणून राहणारच नाही.
या आक्रमनरुपी संकटांतून मुक्ती हवी असेल तर आदिवासींतल्या जाणकारांनी,सुशिक्षितांनी, कर्मचारी,अधिकारी, साहित्यिक व ज्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. या  साऱ्यांनीच एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्यासाठी काही उपक्रम आखून समाजबांधणी करणे काळाची गरज बनली आहे.

आदिवासी कोळी महादेव समाज विकास सघंटना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष~रावसाहेब पवार 9657130470/  9527433093

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट