कोरोना महामारीच्या काळात घरी बसण्यासाठी
*केवळ एकाच्या गल्तीनं.....*
.....................................
आता घरात बस रं नाना
हात जोडीते पुनःपुन्हा
केवळ एकाच्या गल्तीनं
घर होईल सुनासुना
नको पारावर थांबू
नको तोंडाचा रं चंबू
करशील येडापणा
खाशील पोकळ बांबू
धुंडू नको मोहूचं फूल
नको तंबाखूला चुना
केवळ एकाच्या गल्तीनं
घर होईल सुनासुना
अशीकशी ही बिमारी
बया कोरोना माहामारी
चूल रुसून बसली
जाऊ कोण्या देवा दारी
माना टाकूनी पानगळ
गाते भाकरीचा गाणा
केवळ एकाच्या गल्तीनं
घर होईल सुनासुना
दिनरात भुरकुंडा
घालू नको कोलदांडा
पोट घेऊनी चालला
माझा आदिमाचा तांडा
तुझं विमान बेइमान
सांग काय माझा गुन्हा
केवळ एकाच्या गल्तीनं
घर होईल सुनासुना
देतो निसर्ग रानमेवा
वाट दावितो काजवा
शिशी उताणी पाताणी
कसा लावू रं म्या दिवा
माझी जिंदगी 'लॉकडाऊन'
नको वाजवू तुणतुणा
केवळ एकाच्या गल्तीनं
घर होईल सुनासुना
नाही रंक नाही राव
त्याच्या मनी सेवाभाव
आज देवळाबाहेर
म्या पाहिला रं देव
आला धावून देवदूत
त्याचा मोडू नको कणा
केवळ तुझ्याच गल्तीनं
देश होईल सुनासुना
*कवी - रमेश भोये, नाशिक*
टिप्पण्या