चीवड्याचे थालीपीठ
📖 ✍ 📕
*भन्नाट थालीपीठ .....*
😋😋😋
*१.* या पदार्थासाठी घरी
जवळपास २०-२५ दिवस
जुना आणि कुणी खात
नसल्याने दीनवाणे कटाक्ष
फेकत असलेला चिवडा हवा.
*२अ.* आधी हा चिवडा संपावा
म्हणून घरातल्यांना आग्रह करून,
त्यांची बोलणी खाल्लेली असावी.
म्हणजे आई तुला खपवाखपवी
करायला आम्हीच लागतो कां
असे मुलांनी म्हणायला हवे.
*२ब.* ए तुझे चिवडा पुराण
बस कर बाई तू खा मला नको.
असे नव-यानेपण म्हणायला हवे
*२क.* मग मी तरी तुला का
खाऊ ... असे दुर्लक्ष आपणपण
करायला हवे.
असे काही घडले की चिवड्याची
खुमारी अधिक वाढते.
*कृती ....* ⤵️
तर असा चिवडा *खसकन*
डबा ओढून *वसकन*
मिक्सरच्या भांड्यात ओतावा.
*खर्रकन* मिक्सरचा कान पिळून
चिवड्यातले दाणे, कढीपत्ता,
डाळे, मिरच्या या सह तो
मिक्सरमधून बारीक दळावा.
परातीत घेऊन त्यात
वाटीभर बेसन व
वाटीभर कणीक
बचकभर तिखट,
चिमूटभर हळद,
चवीनुसार मीठ,
कचाकचा कापलेला कांदा
घालून वचकटपणे मिसळावे.
शेतक-याच्या संपामुळे
२० रू ला २० काड्या
मिळालेल्या कोथिंबिरीच्या
काड्यातल्या ५ - ६ काड्या
ओढून *कराकरा* चिरून त्यात
घालाव्यात.
पाणी घालून लेकराला
जितक्या मायेने *गोंजारतो*
तसे *गोंजारून* गोळा मळावा.
*धपकन* तवा ठेऊन त्यावर
*सर्रकन* तेल ओतावे.
मग थालिपीठाचा गोळा
त्यावर ठेवून नव-याने
सांगितलेली भाजी न आणता
भलतीच भाजी आणली की
कित्ती कित्ती प्रेमाने
त्याच्याकडे बघतो तितक्या
प्रेमाने थालीपीठाकडे बघून
त्याला *थापट्या* मारून गोल
थापावे. मग निर्ममतेने त्याच्या
पोटात बोटे *खूपसुन* त्यात तेल
भरावे. मग झाकण ठेवून त्याला
*कोंडावे.* ते थालिपीठ *चर्र* आवाज
करून निषेध करायला लागले की
उलटावे. खालून ते संतापाने लाल
झाले असते मग दुस-या बाजूला
पण चांगला चटका द्यावा.
असे खरपूस भाजलेले
थालीपीठ *भस्सकन* पानात
काढावे एव्हाना नाके
मुरडणा-या मुलांच्या नाकात
*खमंग दरवळ* शिरलेला असतो
मग ते *खस्सकन* हातातले ताट
ओढून तुकडा मोडून *गपकन*
तोंडात घालतात.
मग *wow आई* .... *सुपर* ...
साॅल्लीड अशा प्रतिक्रिया
येतात आणि *आपले कान*
*तृप्त होतात.*
आई परत कर असे थालीपीठ
अशी प्रतिक्रिया येते ....
मग मेल्यांनो परत चिवडा
करते आता अशी प्रतिक्रिया
देऊन त्यांच्या गोंधळलेल्या
चेह-याकडे बघून दुसरे
थालीपीठ लावायला घ्यावे ..
अशी ही चिवड्याच्या
थालीपीठाची
*कहाणी सुफळ संपूर्ण. ...*
*फूलटूस खादाड खवैय्ये ..*
📖 ✍
टिप्पण्या