ग्रामीण मराठी शब्द
*विस्मरणात चाललेले, ग्रामीण मराठी शब्द*....
मराठी भाषेला समृध्द करणारे, ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनात सहजपणे वापरले जाणारे, व काळाच्या ओघात काहीशा, विस्मृतीत गेलेल्या शब्दांचा, मागोवा...
जसजसे शेतीबाडीचं यांत्रिकीकरण होऊ लागलं, गावगाड्याला नागरीकरणानं भरकटून टाकलं , गावाकडचं घर बदललं आणि ‘बंगलो स्किम’ आली,तसतसे हे शब्द हरवले जाऊ लागले !
उदा....
ओटा,
पडवी,
न्हाणीघर,
माजघर,
शेजघर,
माळवद,
धुराडे-धारे ,वासं-आडं,
लग,
दिवळी,
खुंटी,
फडताळ,
परसदार,
पोत्यारं,
चावडी,
चौक,
पार,
पाणवठा,
उंबरठा,
कडी कोंयंडा,
खुराडं,
उकीरडा .
बैलगाडी जाऊन, ट्रॅक्टर-यांत्रिकी अवजारं आल्यानं ....
औत,
रूम्हणं,
चाडं,
लोढणे,
वेसण,
झूल,
तिफण,
जू,
वाधी,
कासरा ,
दावं ,
चऱ्हाट
या शब्दांना आपण, हरवून बसलो. विहिरीवरची मोट गेली, पंप आले,परिणामी...
मोट,
नाडा,
शिंदूर,
धाव,
दंड,
ओपा,
पलान हे शब्द दिसेनासे झाले.
खुरपणी,
मोडणी,
मोगडणी,
उफणणी,
बडवणी,
खुडणी,
कोळपणी,
दारं धरणं,
खेटं घालणं,
माळवं ,यांचा अर्थच अलीकडच्या पिढीला समजत नाही.
रास,
सुगी,
गंजी,
कडबा,
पाचुंदा,
बोंडं,
सुरमाडं,
भुसकाट,
शेणकूट,
गव्हाण ,या शब्दांचंही तसंच! धान्य दळायचं दगडी जातं, खुट्टा,मेख हेही काळाच्या पडद्याआड चाललेत.
साळुता आणि केरसुणी ऐवजी झाडू आला. चपलेला पायताण,
गोडेतेलाला येशेल तेल,
टोपडय़ाला कुंची म्हटलं जायचं, हे आता सांगावं लागतं.
गावंदर,
पाणंद,
म्हसनवाट, हे शब्द नागरीकरणामुळं मागं पडलेत.
चांभाराची रापी,
सुताराचा वाकस,
कुंभाराचा आवा,
लोहाराचा भाता,
ढोराची आरी,
बुरूडाची पाळ्ळी ही हत्यारांची नावं आता कुणाला तरी आठवतात का?
पतीला दाल्ला (दादला),
पत्नीला कारभारीण,
सासर्याला मामंजी,
सासूला आत्याबाई,
नणंदेला वन्स,
बहिणीच्या पतीला दाजी म्हणतात,
हे आताच्या नव्या पिढीला सांगावं लागतं, नाही का?
स्वयंपाकघराचं किचन झालं आणि
कोरडयास ,
कालवण,
माडगं,
डिचकी,
शिंकाळं,
उतरंड,
भांची,
डेरा,
दुरडी,
बुत्ती,
चुलीचा जाळ,
भाकरीचा पापुद्रा,
ताटली, उखळ,मुसळ हे शब्द देखील नागर संस्कृतीनं बाजूला सारले.
रविवार हा सुट्टीचा दिवस, निवांत असण्याचा दिवस म्हणून तो आईतवार,
तर गुरुवार म्हणजे, बृहस्पतीवार.
त्याचा अपभ्रंश होऊन बस्तरवार झाला.
पहाटेच्या वेळेला ‘झुंझुरकं’,
सकाळी लवकर म्हणजे ‘येरवाळी’ , आणि सायंकाळला सांजवेळ , दिवेलागण म्हणजे ‘कडुसं (कवडसे) पडताना’ अशी शब्दयोजना होती.
अंगदट (बळकट),
दीडकं-औटकं (एकपासून शंभर पर्यंतच्या संख्येची पावकी, निमकी,पाऊणकी दीडपट-पावणेदोन पट साडेतीनपट संख्या दाखवणारं कोष्टक),
झोंटधरणी (भांडण),
पेव,कोठी, कणगी (धान्य साठवण्याचं साधन) हे शब्दही आताशा हरवलेत.
इस्कोट (बिघडवणं),
सटवाई (नशिब लिहिणारी देवता),
सांगावा (निरोप),
गलका (गोंगाट),
हेकना (चकणा),
मढं (मृतदेह),
पल्ला (अंतर),
शिमगा (होळी किंवा शंखनाद),
चिपाड (वाळलेला ऊस),
अक्काबाईचा फेरा (दारिद्रय़),
अक्करमाशा (अनौरस),
अवदसा (दुर्दशा),
इडा-पीडा (सर्व दु:ख),
कागाळी (तक्रार),
चवड (रास, ढीग),
झिंज्या (केस),
वंगाळ (वाईट),
डोंबलं (डोकं),
हुमाण (कोडं),
भडभुंज्या (चिरमुरे, लाह्या भाजणारा)ही मराठी भाषेला , ग्रामीण भागानं दिलेली, शब्द भेटीतली वानगीदाखल उदाहरणं.
*कृपया आपण देखील आपल्या शब्दसंग्रहात असलेले, आपल्या मनातील पिंपळ पानावर कोरुन ठेवलेले, मात्र सध्या कालबाह्य झालेले शब्द व संकल्पनाच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करु या* !
टिप्पण्या